अहमदनगर: एका दुकानदाराचे आणि एका भाजी विक्रेत्याचे भांडण झाले. या वादातून महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने प्रोफेसर चौकातील सर्वच भाजीविक्रेत्यांना हटवले आहे. कोरोनाच्या काळातही आम्ही शिस्तीत आमचा व्यवसाय करतो, मात्र एका वादामुळे सर्वांनाच शिक्षा का?असा सवाल भाजी विक्रेत्यांनी केला आहे.
प्रोफेसर चौकात अनेक दिवसांपासून भाजी विक्रेते बसतात. रस्त्याच्या कडेने दिलेल्या जागेवर ते भाजी विक्री करतात. यापूर्वी भाजी विक्रेत्यांना हटविण्यात आले होते. त्यांना सावेडी येथील सावित्रीबाई फुले व्यापारी संकुलात जागा दिली होती. मात्र तेथे ग्राहक येत नाहीत, तसेच तिथे धंदाही होत नसल्याचे कारण दिले होेते. त्यावेळी माजी आमदार स्व. अनिल राठोड यांनी विक्रेत्यांची बाजू घेत त्यांना पुन्हा चौकात बसू देण्यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे विक्रेते पुन्हा चौकात बसत होते.
आता राठोड गेले तर आमची बाजू कोणीच घेत नाही, असे विक्रेतेही काकुळतेने सांगत होते.गेल्या चार दिवसांपासून सध्या प्रोफेसर चौक मोकळाच आहे. जवळपास ५० ते ६० विक्रेते रस्त्याच्या कडेने असतात. लॉकडाऊनमुळे आधीच धंद्यावर परिणाम झाला आहे. त्यात महापालिका प्रशासनाने आमच्यावर अन्याय केला, असे विक्रेते सांगत आहेत. महापौर, आयुक्तांची भेट घेऊन आम्ही आमची कैफीयत तर मांडूच, मात्र त्यांनी स्वत:हुन आम्हाला न्याय द्यावा. कोणी भांडणे करीत असतील, नियमांचे पालन करीत नसतील तर त्यांच्यावर जरूर कारवाई करा, असेही विक्रेत्यांनी सांगितले.