लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या परिसराची आरोग्य व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी संयुक्त पाहणी केली. कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पहिल्या टप्प्यात बोल्हेगाव परिसरात तीन ठिकाणे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. हा भाग पत्रे लावून बंद करण्यात आला आहे. शहराच्या इतर कुठल्या भागात पाचपेक्षा जास्त रुग्ण आहेत, याचा शोध महापालिकेकडून घेण्यात येत आहे. रविवारी शहर अभियंता सुरेश इथापे यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मध्यवर्ती शहरातील विविध भागाची पाहणी केली. यामध्ये १ किंवा २ रुग्ण असलेले परिसर आढळून आले आहेत. अशा भागात कंटेनमेंट केला जाणार नाही. पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेला भाग कंटेनमेंट केला जाणार असून, सोमवारी आणखी कंटेनमेंटची घोषणा महापालिकेकडून केली जाऊ शकते. यापूर्वी कॉलनी, गल्ली कंटेनमेंट केले जात होते. यावेळी मात्र कंटेनमेंटच्या झोनचे क्षेत्र कमी करण्यात आले असून, अपार्टमेंट किंवा ३ ते ४ घरेच फक्त बंद केले जाणार आहेत.
महापालिकेच्या सात उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या प्रभागांतील कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी नागरिकांना आवश्यक सेवा पुरविण्याचे काम करणार आहेत.
..
- शहरातील पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या भागाची पाहणी करून कंटेनमेंट करण्यात येणार आहे. रविवारी काही भागाची पाहणी करण्यात आली असून, तो भागही कंटेनमेंट केला जाणार आहे.
- सुरेश इथापे, शहर अभियंता