राज्य सरकारने राज्यातील वस्त्यांना जातीऐवजी महापुरुषांची वा तत्सम नावे देण्याचा निर्णय घेतला. सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असला तरी वस्त्यांची नावे बदलून विकास साधला जाईल काय, हा महत्त्वाचा विषय आहे. घाटघर, आंबित, पाचनई, कुमशेत आदी ग्रामीण दुर्गम भागातील वस्त्यांची नावे बदलली तरी त्या वस्तीतील लोकांच्या मनातील आपले पारंपरिक नाव तसेच राहणार आहे आणि यातून तेथील भागाचा व नागरिकांचा विकास साधला जाणार नाही.
खऱ्या अर्थाने विकास करावयाचा असेल, तर विस्ताराने सर्वात मोठ्या असणाऱ्या नगर जिल्ह्याचे विभाजन होणे काळाची गरज आहे. घाटघर, आंबित, पाचनई, कुमशेत, बिताका आदी दुर्गम भागातील लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे असल्यास पैशाबरोबर अधिक वेळही खर्च होत आहे. संगमनेर जिल्ह्याची निर्मिती झाल्यास खर्च होणाऱ्या रकमेबरोबर वेळही वाचेल आणि विकासाला चालनाही मिळेल. अकोले तालुक्याचेही विभाजन करीत स्वतंत्र राजूर तालुक्याची निर्मिती करावी आणि संगमनेर तालुक्यातील पठार भागाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या भागाचा विकास करण्यासाठी घारगाव तालुक्याची निर्मिती करावी.