अहमदनगर : अल्प काळात सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या. बुधवारी होणाऱ्या मतदानासाठी आता छुप्या पध्दतीने प्रचार, वैयक्तिक भेटीगाठींना उत येणार आहे. याकाळात काही गैरप्रकार होऊ नयेत, याची काळजी प्रशासन घेणार आहे. प्रचारासाठी अवघा ११ दिवसांचा कालावधी असल्याने सर्वच पक्षाच्या नेत्यांची याकाळात धावपळ होतांना दिसली. जिल्ह्यात विधानसभेच्या १२ जागा आहेत. प्रत्येक मतदारसंघात अटीतटीची लढत असून काही चौरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी लढती आहेत. १ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर खऱ्याअर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि सेना यांनी निवडणुकीत एकमेकांसमोर कडवे आव्हान उभे केल्याने कोण बाजी मारणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मनसेनेही काही ठिकाणी उमेदवार उभे करत निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. निवडणुकीला ग्रामपंचायत निवडणुकीचे स्वरूप आल्याने उमेदवार एक-एक मतांसाठी झगडतांना दिसले. २ आॅक्टोबरपासून जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी पेटली. यात पंतप्रधानांसह आजी-माजी केंद्रीय मंत्र्यांनी उडी घेत आरोपांची राळ उडवून दिली. स्थानिक मुद्यापासून पाणी, रस्ते, शेती माल आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न, विकासाचा मुद्दा, विजेचा प्रश्न यावर प्रचारादरम्यान साधक-बाधक चर्चा झाली. तसेच हे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व पक्षांनी जिल्ह्यातील मतदारांना बहुमताची साद घातली आहे. त्याला जिल्ह्यातील मतदार कसा प्रतिसाद देतात हे १९ तारखेला दिसणार आहे. मतदानापूर्वी उमेदवारांना मतदारांच्या व्यक्तिगत भेटीसाठी एक दिवसाचा कालावधी मिळाणार असून या काळात बांधावर असणारी मते आपल्या बाजूने वळविण्यास वेळ मिळणार आहे. प्रचारासाठी अवघा ११ दिवसांचा कालावधी मिळाल्याने अनेक मतदारसंघात उमेदवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची संपर्कासाठी जाहीर सभांसाठी अडचण झाल्याचे दिसून आले. यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्या एकाच दिवसात अनेक ठिकाणी सभा घ्याव्या लागल्या. (प्रतिनिधी)यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अभिनेता रितेश देशमुख, आदेश बांदेकर, अमोल कोल्हे, संगीतकार अवधूत गुप्ते, शिवचरित्रकार नितीन बानगुडे पाटील, शिवरत्न शेटे यांच्या शिवाय अन्य सेलिब्रिटी प्रचारासाठी येऊ शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय आजी-माजी मंत्री यांनी जिल्ह्यात हजेरी लावली. यात अमित शहा, नितीन गडकरी, स्मृती इराणी, उमा भारती, शरद पवार, गुलामनबी आझाद, सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावत निवडणुकीची रंगत वाढविली.राज्य पातळीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे, निलम गोऱ्हे, भाई जगताप, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, आर.आर. पाटील, पंकजा मुंडे, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे, महादेव जानकर, सुहास सामंत, रतनलाल सोनग्रा, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, वृंदा करात यांच्या सभा झाल्या. आदित्य ठाकरे, विश्वजित कदम आणि उमेश पाटील या युवा नेतृत्वाने जिल्ह्यात हजेरी लावली होती. जिल्ह्यात फक्त दोनच रोड शो झाले.
प्रचाराच्या तोफा थंडावल्या
By admin | Updated: October 13, 2014 23:07 IST