ओहोळ म्हणाले, थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विघ्नहर्ता लॉन्स येथे पाचशे बेडचे कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये तसेच शहर व तालुक्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या अनेक कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजनची गरज भासते आहे. ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी महसूलमंत्री थोरात हे प्रयत्नशील आहेत. त्यांनी हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाबाबत माहिती घेतली. त्या संदर्भाने तातडीची बैठक बोलावून चर्चा केली. त्यानंतर तैवान येथून तातडीने यंत्रसामग्रीची खरेदी करण्यात आली आहे.
कारखाना परिसरात कार्यान्वित होणाऱ्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून एका दिवसाला सात घनमीटर क्षमतेचे ८५ ऑक्सिजन सिलिंडर भरले जाऊ शकतील, एवढ्या क्षमतेचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे संगमनेरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना तातडीने ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी कारखाना प्रशासन परिश्रम घेत आहे.