भिंगार : छावणी परिषद निवडणुकीत पक्षचिन्हाचा घोळ अजून सुरूच असून, निवडणूक निर्णय अधिकारीच अंतिम निर्णय घेतील असे शुक्रवारी पुन्हा स्पष्ट करण्यात आले़ सोमवारपर्यंत पक्षचिन्हाबाबत (दि़१) निर्णय घेणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जी़पी़ दानेज यांनी सांगितले आहे़ मात्र, हा निर्णय काय असणार याकडे आता सर्वपक्षीयांचे लक्ष लागून आहे़ छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर जी़ एस़ संघेरा यांची गुरुवारी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेत पक्ष चिन्हावर निवडणूक घ्यावी, अशी विनंती केली होती़ संघेरा यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय घेऊन कळवू असे यावेळी सांगितले होते़ निवडणुकीत पक्षचिन्हाचा घोळ न सुटल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे़ तर नागरिकांसाठी हा विषय कुतूहलाचा बनला आहे़ सर्व घडामोडी लक्षात घेवून छावणी परिषदेने सर्वपक्षीय प्रतिनिधींचे मत लक्षात घेऊन पक्षचिन्हाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविले आहे़ निवडणूक निर्णय अधिकारी दानीज यांनी सोमवारपर्यंत चिन्हाबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
पक्षचिन्हाचा घोळ सुरूच
By admin | Updated: November 29, 2014 00:00 IST