करंजी : अरुंद रस्ता, दरड कोसळून रस्त्यावर मोठमोठे दगड पडलेले, ही अवस्था काही कोकणातील रस्त्याची नसून वृद्धेश्वर घाटाची झाली आहे. यामुळे येत्या काही दिवसांतच वृद्धेश्वर-सावरगाव रस्त्यावरील वाहतूक बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
श्री क्षेत्र वृद्धेश्वरवरून (ता.पाथर्डी) - सावरगावला (ता.आष्टी ) जाण्यासाठी वृद्धेश्वरच्या घाटातून जावे लागते. अतिशय अरुंद रस्ता, वेडी-वाकडी खचलेली वळणे, रस्त्यावरच दरड कोसळून आलेल्या मोठमोठ्या दगडांना चुकवत, प्रवाशांना या घाटातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वृद्धेश्वरवरून बीड जिल्ह्यातील गावांना, तसेच श्री क्षेत्र मायंबाला जाण्यासाठी हा अतिशय जवळचा मार्ग असल्याने, अनेक प्रवाशी व भाविक देवाचे नामस्मरण करीत याच घाटातून प्रवास करीत आहेत. डोंगराचे रस्त्यात पडलेले मोठमोठे दगड, घाटातच अनेक अवघड वळणांवरील रस्ताच वाहून गेला आहे. रस्त्यावर डांबरच राहिले नसल्याने खडी उघडी पडली आहे. या रस्त्यावर एखादे वाहन नादुरुस्त झाले, तर हा रस्ता रहदारीस बंद होतो. या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, या महत्त्वाच्या रस्त्याकडे ना लोकप्रतिनिधींचे ना प्रशासनाचे कोणाचेच लक्ष नाही.
अहमदनगर व बीड जिल्ह्यांना जोडणारा जवळचा व महत्त्वाचा रस्ता आहे. श्री क्षेत्र वृद्धेश्वरवरून मायंबा (मच्छींद्रनाथ) देवस्थानला जाणाऱ्या या रस्त्यावरून राज्यातील विविध भागांमधून भाविक मोठ्या संख्येने प्रवास करतात. या रस्त्यावर एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच संबंधित खात्यास जाग येईल का, असा संतप्त सवाल प्रवाशांमधून विचारला जात आहे.
----
जिल्ह्यातील बहुतेक देवस्थानचे रस्ते दुरुस्त करण्यात आले. हद्दीच्या वादावरून मात्र वृद्धेश्वर घाटाची अवस्था वर्षानुवर्षापासून तशीच आहे. अतिशय महत्त्वाच्या रस्त्याचे काम त्वरित व्हावे.
- नवनाथ पाठक, माजी उपसरपंच, घाटसिरस
---
श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थानच्या दर्शनासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. भाविक जीव धोक्यात घालून या घाटातून प्रवास करीत आहेत. मात्र, देवस्थानच्या या रस्त्याकडे कोणाचेच लक्ष नाही.
- मुरलीधर पालवे, अध्यक्ष, वृद्धेश्वर देवस्थान
---
नवनाथांपैकी मच्छींद्रनाथ (मायंबा) गडावर येण्यासाठी वृद्धेश्वर घाटातून यावे लागते. या घाटातील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली. या घाटात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
- दादासाहेब चितळे, अध्यक्ष, मायंबा देवस्थान
----
२३ वृद्धेश्वर रोड
वृद्धेश्वर घाट रस्त्याची झालेली दुरवस्था.