संगमनेर : पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात नाशिकच्या सराफाला अटक न करण्यासाठी एका तरुणामार्फत एक लाख रुपयांची लाच स्वीकारणारा संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व एका तरुणास नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
ही कारवाई मंगळवारी (दि. ३) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर करण्यात आली. राणा प्रतापसिंग परदेशी (३२, पोलीस उपनिरीक्षक, संगमनेर शहर पोलीस ठाणे) व विशाल राजेंद्र पावसे (३१, रा. साईश्रद्धा चौक, संगमनेर) अशी लाच स्वीकारणाऱ्या दोघांची नावे आहेत.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद दाखल होती. या गुन्ह्यात नाशिकच्या सराफाला अटक न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी याने मध्यस्तीमार्फत सराफाकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात एक लाख रुपयांत तडजोड झाली. संगमनेर नगर परिषदेच्या क्रीडा संकुलाजवळ पोलीस उपनिरीक्षक परदेशी व पावसे यास एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.