देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथील पुणे-नगर जिल्हा हद्द चेक पोस्टवर बंदोबस्तासाठी असलेले सात पोलीस कर्मचारी बालंबाल बचावले. दुभाजक तोडून ट्रक तीस फूट खड्ड्यात कोसळला. ही घटना रविववारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी धान्याचा ट्रक उलटला होता. त्यावेळी शिरूर पोलीस थोडक्यात बचावले होते.
नगर-पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी येथे जिल्हा सरहद्दीवर बेलवंडी पोलीस स्टेशनअंतर्गत वाहन तपासणीसाठी तात्पुरती चौकी उभारली आहे. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नगरहून पुण्याच्या दिशेने भरधाव सिमेंट घेऊन निघालेला ट्रेलर ट्रक (एम.एच. १२ एलटी ४०५०) वरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे हा ट्रक दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला असलेल्या ३० फुट खोल खड्ड्यात गेला. हा ट्रक पोलीस चौकीपासून अवघ्या एक फुटावरून धडधडत गेल्याने क्षणभर पोलिसांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता.
यावेळी बंदोबस्तासाठी असलेले बेलवंडी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस नाईक शोभा काळे, पो. कॉ. संदीप दिवटे, हवालदार पोपट ठोकळ, हेड कॉन्स्टेबल किरण बारवकर, संपत गुंड, होमगार्ड संतोष लगड, अक्षय जगताप हे सर्व कर्मचारी तिथे बंदोबस्तावर होते. प्रसंगावधान राखून ठोकळ यांनी इतरांना बाजूला ढकलल्याने अनर्थ टळला. चौकी शेजारी उभ्या असलेल्या दुचाकीला ट्रकची धडक बसल्याने दुचाकी खड्ड्यात गेली.
---
१७ गव्हाणेवाडी
गव्हाणेवाडी चेकपोस्ट येथे दुभाजक तोडून रस्त्याच्या खाली कोसळलेला ट्रक.