नेवासाफाटा : विष प्राशन करुन आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्याच्याच तोंडात पाच जणांनी विष ओतल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे़ नगर-औरंगाबाद महामार्गावरील वडाळा बहिरोबा नजिकच्या खरवंडी येथे ही घटना घडली़मळ्याकडे जाणारा रस्ता करण्यासाठी अडसर ठरणारे छप्पर खंडू शहादू खिलारी (वय ५०) यांनी काढून घ्यावे, यासाठी शिवाजी तुकाराम रोडे, अशोक तुकाराम रोडे, गणेश अशोक रोडे, हिराबाई शिवाजी रोडे, सुनीता अशोक रोडे हे खिलारी यांच्यावर अनेक दिवसांपासून दबाव आणीत होते़ हे छप्पर काढण्यासाठी खिलारी यांना दमबाजी होत होती़ १७ मे रोजी रोडे कुटुंबीयांनी खिलारी यांना गाठून छप्पर काढण्यासाठी मारहाण केली़ त्यामुळे खिलारी यांनी मला त्रास देऊ नका, अन्यथा मी विष पिऊन आत्महत्या करीन, अशी धमकी रोडे कुटुंबीयांना दिली़ रोडे कुटुंबीयांना या धमकीचा राग अनावर झाला़ तू काय विष पितो, आम्हीच तुला विष पाजतो, असे म्हणत रोडे कुटुंबीयांनी खिलारी यांना खाली पाडले व खिलारी यांच्या तोंडात विष ओतले़ मात्र, खिलारी यांनी कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेत तेथून पळ काढला, असे खिलारी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़ नगरच्या जिल्हा रुग्णालयात चार दिवस उपचार घेतल्यानंतर खिलारी यांनी शनिवारी (दि़ २१) शिंगणापूर पोलीस ठाणे गाठून शिवाजी तुकाराम रोडे, अशोक तुकाराम रोडे, गणेश अशोक रोडे, हिराबाई शिवाजी रोडे, सुनीता अशोक रोडे यांच्याविरोधात फिर्याद दिली़
धमकी देणाऱ्याच्या तोंडात ओतले विष
By admin | Updated: May 22, 2016 00:18 IST