तीसगाव : तीसगाव- शेवगाव- पैठण राज्यमार्गावर चितळी (ता. पाथर्डी) येथील वळणावर खड्ड्यांमुळे काही दिवसांपासून दररोजच अपघात घडत आहेत. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने गावकुसाच्या थांब्याजवळ ढवळेवाडी येथील कडूबाई सोनाजी वाळके या मोटारसायकलवरून पडल्याने गंभीर जखमी झाल्या. गुरुवारी ग्रामस्थांत याचे पडसाद उमटले. अपघात घडविणाऱ्या या प्रमुख राज्यामार्गांवरील खड्ड्यात त्यांनी वृक्षारोपण केले. बांधकाम अधिकाऱ्यांचा निषेध केला.
ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आमटे, ज्येष्ठ ग्रामस्थ विनायक ताठे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. रस्त्याच्या मधोमध वृक्षारोपण मोहीम अचानकपणे दिसल्याने एसटीसह इतरही प्रवासी वाहने थांबली. त्यांनीही निषेध आंदोलनाला समर्थन दिले. याच मार्गावरून जाणारे पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर यांच्याकडेही ग्रामस्थांनी तक्रारी केल्या. अकोलकर यांनी बांधकाम विभागाचे अभियंता महेश पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून जाब विचारला. खड्ड्यांमुळे अपघात घडत असल्याने ग्रामस्थांचा रोष वाढत आहे. किमान मुरमाने तरी खड्डे भरा. दुरुस्तीचा निधी जातो तरी कुठे, असे खडेबोल अकोलकर यांनी अभियंत्यांना सुनावले. रवींद्र ताठे, सुनील ताठे, अरुण ताठे, किशोर ताठे, शरद ढमाळ आदी उपस्थित होते.
--
राज्यमार्गावरील खड्ड्यांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती मोहीम लवकरच राबवू. तात्पुरते मुरमाने खड्डे भरण्यासाठी मनुष्यबळ कमी आहे.
-महेश पाटील,
शाखा अभियंता
----
०९ चितळी
चितळी येथे ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्ड्यांतच वृक्षाराेपण केले.