अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, कर्मचारी मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत़ सकाळी ८ वाजता सर्व मतदारसंघात एकादाच मतमोजणीला सुरुवात होऊन जिल्ह्यातील १२ मतदारसंघात एकूण २१ फेऱ्या होणार आहेत़ पहिल्या फेरीचा निकाल साधारपणे नऊ वाजेच्या सुमारास जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले़विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी होत आहे़ जिल्ह्यात १२ मतदारसंघ आहेत़ सर्व मतदारसंघात एकाचवेळी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल़ मतमोजणी रविवारी होणार असली तरी प्रशासनाने मोजणीची तयारी शनिवारीच पूर्ण केली़ मतदारसंघनिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ कर्मचाऱ्यांच्या २२ टीम तयार करण्यात आल्या आहेत़ त्यांना याविषयी प्रशिक्षणही देण्यात आले आहे़ प्रशिक्षणात मतदानयंत्र उघडणे, मतदानयंत्रातील आकडे उमेदवारांच्या प्रतिनिधींना दाखविणे, उमेदवारांच्या अनुक्रमांकासमोरील मतांच्या आकड्यांची नोंद घेणे,आदी बाबीची कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली़ प्रशिक्षणानंतर कर्मचारी मतमोजणी केंद्रांवर हजर झाले आहेत़ निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थित मतदानयंत्र असलेल्या खोल्या सकाळी ६ वाजता उघडण्यात येतील़ सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची मोजणी होईल़ त्यानंतर १४ टेबल ठेवण्यात येतील़ या टेबलांवर १४ मतदानयंत्र असतील़ प्रत्येक यंत्रासाठी चार कर्मचारी असणार आहेत़ एका फेरीत १२ ते १५ हजार मतांची मोजणी होणार आहे़ पहिल्या फेरीचा निकाल साधारण नऊ वाजता जाहीर होण्याची शक्यता आहे़ मतमोजणी परिसरात उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे़ तीन टप्प्यांत पोलिसांचा खडा पाहारा असणार आहे़ (प्रतिनिधी)
दुपारपर्यंत चित्र स्पष्ट
By admin | Updated: October 19, 2014 00:39 IST