घारगाव : नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात पुण्याकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकला पाठीमागून गोमांस घेऊन जाणाऱ्या पिकअपने जोरदार धडक दिली. यात पिकअप महामार्गावरच उलटली. सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मालवाहू ट्रक (क्र. एम.एच.१२, एन.एक्स.६६७३) चे चालक बबन कुंडलिक बनसोडे (वय ४० रा.मारुंजी, ता.मुळशी, जि.पुणे) हा सोमवारी ट्रकमध्ये ब्लॉक घेऊन संगमनेरकडून पुण्याकडे जात होता. दरम्यान, डोळासणे शिवारातील बांबळेवाडी येथे आला असता पाठीमागून गोमांस घेऊन येणारी भरधाव पिकअप (क्र.एम.एच. ४७, ई.२७६०) चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकला जोरदार धडकली. यात ७५० किलो गोमांस भरलेले असल्याने पिकअप महामार्गावरच उलटली. अपघातानंतर पिकअपमधील गोमांस महामार्गावर विखुरले होते.
या अपघाताची माहिती समजताच डोळासणे महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद गिरी, संजय मंडलिक, सुनील साळवे, उमेश गव्हाणे, घारगाव पोलीस ठाण्याचे मुख्य हवालदार राजू खेडकर, पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलिसांनी हे गोमांस जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून महामार्गाच्या कडेला खड्डा खोदून त्याची विल्हेवाट लावली. याप्रकरणी ट्रकचालक बबन बनसोडे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार आदिनाथ गांधले हे करीत आहेत.