सोनई : सोनई-करजगाव योजनेच्या भूमिपूजन किंवा उद्घाटनाचे नारळ न फोडता आपण ही योजना कटाक्षाने कार्यान्वित करून घेतली. लोकप्रतिनिधी आपल्याला पाणी योजनेत रस नसल्याचे उघडपणे सांगतात. त्यांना जनतेच्या प्रश्नात रस नसेल तर मग त्यांना नेमका कशात रस आहे? असा प्रश्न माजी आमदार शंकरराव गडाख यांनी उपस्थित केला. विधानसभा निवडणूक प्रचारार्थ नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉ. बाबा आरगडे होते. गडाख म्हणाले, सोनई-करजगाव योजनेची दोन कोटी रूपयांची कामे अपूर्ण असतानाही ती पूर्ण असल्याचे दाखवून सर्व बिल ठेकेदारास अदा करण्यास लोकप्रतिनिधींनी दबाव टाकला. योजना बंद पाडण्याची भीती दाखवून ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करण्यासाठी राजकीय दबाव वाढवला. मात्र त्यांच्याच सरकारने या योजनेत त्रुटी असल्याचे मान्य करत या योजनेला दिलेली मुदतवाढ मुरकुटे यांना चपराक आहे, अशी टीका गडाख यांनी केली.गडाख म्हणाले, जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांनी सध्या चलती असलेल्या राजकीय पक्षांची साथ घेतल्याचे दिसून येते. अपक्ष उमेदवारी करण्याचे धाडस कोणी दाखवत नसताना आपण ते करून राजकीय अडचणीची वाट सामान्य जनतेसाठी निवडली. एकदा आमदारकीची संधी मिळाली. परंतु, पक्षीय मर्यादांमुळे पाहिजे तितक्या प्रभावीपणे काम करता आले नाही. पक्षाच्या आमदाराला गृहित धरले जाण्यामुळे त्याचा थेट परिणाम तालुक्याच्या विकासावर झाला. तरीही विकासकामे करण्याचा आटोकाट प्रयत्न करत अकराशे वीज रोहित्रे बसवली, नवीन वीज उपकेंद्रे उभारून शेतकºयांना मुबलक वीज उपलब्ध करून दिली, असे गडाख यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते जबाजी फाटके, लक्ष्मणराव फाटके, सीतारामझिने, भाऊसाहेब मोटे, बाबासाहेब जगताप, बाबासाहेब फोफसे, अजित फाटके, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, संभाजी मुरकुटे, मुकुंद भोगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नात रस नाही-शंकरराव गडाख; खरवंडीत प्रचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 11:35 IST