अहमदनगर : आॅगस्ट महिन्यात गणपतीच्या आगमनापासून नगरमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली होती. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस कमी झाला. मात्र अशा बदलत्या वातावरणाचा परिणाम नगरकरांच्या आरोग्यावर झालेला दिसून आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नगर जिल्ह्यात ताप, सर्दी खोकल्याचे तापाचे २ हजार रुग्ण आढळून आले आहेत. ४ हजार २१४ रुग्ण सर्दी, खोकल्याने परेशान आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्दी, खोकल्याचे ३ हजार ९३७ रुग्ण आढळले होते. आतापर्यंत सप्टेंबरच्या दोन आठवड्यांत मिळून ४ हजार २१४ रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरात गत महिन्यात कावीळची साथ पसरली. त्यानंतर मलेरियाही पसरला. कावीळचे गत आठवड्यात दररोज ५० च्यावर रुग्ण आढळून येत. आता त्यात घट झाली असून ही संख्या १५ वर येऊन पोहचली आहे. कावीळला आळा घालण्याठी महापालिकेने घरोघरी जाऊन सर्व्हे केला. आतापर्यंत ६० हजार घरांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. याशिवाय हॉटेलमधील पाण्याचीही तपासणी करण्यात आली. तीनशे हॉटेलच्या तपासणीअंती जवळपास १०० हॉटेलमधील पाणी पिण्यास दूषित असल्याचे समोर आले. महापालिकेचा फिरता दवाखाना व रिक्षा, पोस्टर्सद्वारे जनजागृती मोहीम हाती घेण्यात आल्याने आजाराची साथ आटोक्यात येत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. रुग्णांची संख्या कमी झाल्याने त्यात काही अंशी तथ्यही दिसून येते. सर्दी, खोकल्यासोबतच डेंग्यूनेही शहरात शिरकाव केला आहे. गत महिन्यात ८४ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. या आठवड्यात फक्त ७ डेंग्यूचे रुग्ण आढळले. (प्रतिनिधी)
तापाचे रुग्ण वाढले
By admin | Updated: September 19, 2014 23:40 IST