अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून जिल्ह्यात रोज चार हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात आयसीयु, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळणे कठीण झाले आहे. कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे खूप हाल होत असून अनेक रुग्णांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथील वाडिया पार्क येथे २ हजार बेड्चे सुसज्य जम्बो केअर सेंटर उभारावे. अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी प्रशासनाला पत्राद्वारे केली आहे.
त्यामध्ये ५०० ऑक्सिजन बेड, ३०० व्हेंटिलेटर बेड व १२०० साधे बेड असावेत. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची तयारी जिल्हा प्रशासनाने तज्ञांच्या सहकार्याने करावी. तसेच रुग्णांवर उपचारासाठी यंत्रसामुग्री, औषधे तसेच रेमडिशिवर इंजेक्शन,सुसज्ज रुग्णवाहिका,ऑक्सीजन प्लांट आदी सुविधा तयार कराव्यात. असेही त्यांनी सांगितले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात दररोज ४० ते ५० रुग्णांचे मृत्यू होत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ लाख ८३ हजार ८१ सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी अनेक प्रयत्न करूनही आयसीयु, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना पुणे पिंपरी चिंचवड शहरात घेऊन जावे लागते. मात्र पुणे पिंपरी-चिंचवडमध्येही रुग्णसंख्या प्रचंड असल्यामुळे त्याठिकाणीही बेड उपलब्ध होत नाहीत. शेवटी रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. तातडीने आमच्या मागणीचा विचार करून जम्बो केअर सेंटर उभारण्याचा युद्धपातळीवर निर्णय घ्यावा. अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.