नगर जिल्ह्यासाठी रोज ६० टन ऑक्सिजन लागतो. मात्र गेल्या चार दिवसांत केवळ १५ टन ऑक्सिजन मिळाला होता. दरम्यान, उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या २१ हजारांपर्यंत गेली असून, रुग्णालयात गंभीर रुग्णही वाढले आहेत. त्यामुळे मंगळवारी अनेक खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने रुग्णांवर उपचार करू शकत नाही, अशी हतबलता डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्यानंतर काही उद्योजकांनी त्यांच्याकडील ऑक्सिजनचे सिलिंडर रुग्णालयांना दिल्याने रुग्णांचे प्राण वाचले. बुधवारी पहाटे दोन वाजता २९ टन क्षमतेचे दोन टँकर जिल्हा रुग्णालयात आले. त्यामुळे ऑक्सिजनची टंचाई कमी झाली असून रुग्णांनाही दिलासा मिळाला आहे. जिल्हा रुग्णालयातून ड्युरो सिलिंडरमार्फत खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आल्याने तात्पुरती टंचाई कमी झाली आहे.
दरम्यान, श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ऑक्सिजनअभावी एकाचाच मृत्यू झाला असून, दुसऱ्याला ऑक्सिजन देऊनही त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
------
पुणे पोलिसांनी अडवले दोन टँकर
नगरला येणारे दोन टँकर पुणे हद्दीत येताच ते पुणे येथील अधिकाऱ्यांनी अडवले. ही बाब महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना समजल्यानंतर त्यांनी थेट मुख्य सचिवांशी संपर्क साधून सदरचे टँकर नगर जिल्ह्यासाठी असून ते अडवू नयेत, असे बजावले. त्यानंतर हे पुणे जिल्ह्याच्या हद्दीत थांबवून ठेवलेले टँकर नगर जिल्ह्यात आले. दरम्यान, दोनपैकी एक टँकर नगरमध्ये आल्यानंतर पंक्चर झाला. तो दुरुस्त करण्यासाठी नगर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली.
--------
नगर जिल्ह्यातील ऑक्सिजनचे टँकर पुण्याच्या अधिकाऱ्यांनी अडवून ठेवले. ही माहिती समजल्यानंतर याबाबत मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर टँकर जिल्ह्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला. या प्रकारामुळे जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचा निष्काळजीपणाच समोर आल्याचे दिसते आहे.
- आ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री