अहमदनगर : जिल्ह्याच्या दक्षिण भागात सोमवार सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरूच होता. आजही पावसाची संततधार सुरुच आहे. जोरदार पावसाने जिल्ह्यातील अनेक गावांना पाण्याने वेढा दिला असून नद्या-नाल्यांना पूर आला आहे.
सोमवारी सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. नगर शहरासह तालुका, श्रीगोदा, पाथर्डी, पारनेर, शेवगाव, जामखेड तालुक्यात पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट सुरू होता. रात्रभर झालेल्या पावसाने सीना नदीला पूर आला आहे. नगरमध्ये कल्याण रोडवरील व जेऊर जवळ औरंगाबादरोडवरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. पावसाने अनेक घरातही पाणी शिरले.
पाथर्डी व शेवगाव तालुक्यात रात्रभर मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान, तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पावसाने नदीकाठची अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.नगर तालुक्यातील जेऊर गावची मुख्य बाजारपेठ संपुर्ण पाण्यात गेली आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. .नगर औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती. सिना व खारोळी नदिला महापुर आला असून आजपर्यंत चा सर्वात मोठा पुर असल्याचे नागरिक सांगत आहेत. नदी, नाले, बंधारे, तलाव तुडुंब होण्याची पहिलीच वेळ होती. पिंपळगाव तलावात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. चापेवाडी, ससेवाडी, तोडमल वाडी, शेटे वस्ती संपर्क तुटला होता.
तिसगाव गर्भगिरी त रात्रभर सलग दहा तास पाऊस झाला. नद्यांना यावर्षी चा पहिलाच पुर आला.अजूनही जोर सुरूच आहे.नदी किनारीच्या घरांचे पायथ्याला पुराचे पाणी टेकले आहे.