अहमदनगर/ दहिगावने : कोरोना महामारीमुळे देशात आणि राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे अनेक तरुणांना आपली नोकरी गमवावी लागली. शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील एका तरुणाचीही यात नोकरी गेली. त्यामुळे बेरोजगारीवर मात करण्यासाठी गावाकडे येऊन या तरुणाने भाजीपाल्याच्या शेतीचा प्रयोग करत बेरोजगारीवर मात केली. रावसाहेब साहेबराव शेळके, असे या तरुणाचे नाव आहे. भावीनिमगाव (ता. शेवगाव) येथे शेळके याने एक एकरावर कोथिंबीर, पाऊण एकरावर भेंडी लावली आहे. सध्या भेंडीला चांगला भाव मिळत असल्याने शेळके याचा भाजीपाला शेतीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
इलेक्ट्रिशियनचा कोर्स केल्यानंतर मागील १० वर्षांपासून औरंगाबाद येथे एका कंपनीत शेळके नोकरीस होता. लॉकडाऊनच्या गर्तेत कंपनी बंद झाली. चांगल्या पगाराची नोकरी बंद असल्याने शहरात राहणे परवडणारे नव्हते. त्यामुळे पत्नी आणि दोन मुलींसह गावाकडे येऊन त्याने वडिलोपार्जित जमिनीत भाजीपाल्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. रावसाहेब याचा चुलत लहान भाऊ देवीदासच्या सहकार्याने २६ मार्च २०२० रोजी भेंडीची पाऊण एकरावर लागवड केली. पिकाची चांगली काळजी घेतली. १५ हजार रुपये उत्पादन खर्चात लागवडीनंतर ४५ दिवसांनी पहिल्या तोड्याला २५ किलो, दुसऱ्या तोड्याला ६० किलो भेंडीचे उत्पन्न मिळाले, तर सध्या भेंडीचा तिसरा तोडा सुरू असून, दोन दिवसांना १०० किलो भेंडी मिळत आहे.
अहमदनगर येथे व्यापाऱ्यांना हा माल विकून ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो दर हातात पडत आहे. भेंडीतून सुमारे एक ते दीड लाखाचे उत्पन्न मिळेल, असा रावसाहेब याला विश्वास आहे. शिवाय कोथिंबिरीतूनही भरघोस उत्पनाची अपेक्षा आहे. रावसाहेब यांनी नोकरी गेल्यामुळे हातावर हात न धरता प्रयोगशील कृती केली अन् यशस्वीतेच उदाहरण आपल्या सर्वांसमोर ठेवलंय.
शेतकरी मोठ्या कष्टाने, विपरीत वातावरणातही भरघोस उत्पन्न घेतात. मात्र, मार्केटिंग आणि विक्री करताना मागे पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक मार्केटिंगचे ज्ञान अद्ययावत करायला हवे. सध्याच्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसला आहे.
-रावसाहेब शेळके, भावीनिमगाव