पिंपळगाव माळवी : दिव्यांग असल्यामुळे हालचालींवर मर्यादा आहेत. परंतु, स्वतःमधील कमतरता कधीही स्वप्नांच्या आड आली नाही. जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्नांद्वारे ती आज सामान्य व्यक्तीसारखे जीवन जगत आहे. टेलरिंग व्यवसाय करून ती आत्मर्निभर बनली आहे.
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील संगीता अर्जुन शिंदे असे तिचे नाव आहे. संगीताला वयाच्या तिसऱ्या वर्षी पोलिओमुळे अपंगत्व आले. तिचे दोन्हीही पाय अपंग झाले आहेत. परंतु, तिने हार न मानता १९८९ मध्ये दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. दिव्यांगांसाठी असलेल्या सायकलवर तिने दररोज चार किलोमीटर प्रवास करून शिक्षण पूर्ण केले. घरच्यांना आपले ओझे वाटू नये, या कारणामुळे तिने दहावीनंतर टेलरिंगचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर तिने घरगुती लेडीज टेलर व्यवसाय चालू केला. घरातील सर्व व्यक्तींनी तिला पाठिंबा दिल्यामुळे ती आज गावातील नामांकित लेडीज टेलर म्हणून प्रसिद्ध आहे. शासनाच्या दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजनेतून तिने शिलाई मशीन घेतली. आज ती आपला टेलरिंग व्यवसाय करून आत्मनिर्भर बनली असून इतर दिव्यांग व्यक्तींसमोर आदर्श ठेवला आहे.
कोट...
दिव्यांग असल्याबद्दल मी कधीही खेद बाळगला नाही. टेलरिंग व्यवसाय करून आत्मनिर्भर बनले आहे. समाजानेही दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांना दयेची नाही सन्मानाची गरज आहे.
-संगीता शिंदे.
कोट..
आम्हाला मुलगी दिव्यांग असल्याची कधीही खंत वाटली नाही. आम्ही तिला सामान्य मुलीप्रमाणे वाढविले. त्यामुळे ती आज स्वतः रोजगार मिळवून आत्मनिर्भर झाली आहे.
-सुमन शिंदे,
संगीताची आई
फोटो : ०२ पिंपळगाव
पिंपळगाव माळवी येथील संगीता शिंदे.