अहमदनगर : शहरातील खासगी रुग्णालयांकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून, डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाइकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार, असा सवाल करीत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी खासगी डॉक्टर प्रशासनाकडे करीत आहेत.
नगर शहरातील खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे, तर ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन तर मिळत नाहीतच, पण ऑक्सिजन विक्रेत्यांकडून आता ऑक्सिजनचा पुरवठाही थांबला आहे. काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन काही रुग्णालयांत आहे. ऑक्सिजन संपला तर रुग्णांवर उपचार करता येणे शक्य होणार नाही, अशी हतबलता काही हॉस्पिटलने रुग्णांच्या नातेवाइकांना बोलून दाखविली. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत प्रशासनाने समन्यायी वाटपासाठी समिती नियुक्त केली आहे; पण ऑक्सिजनचा पुरवठाच नाही तर वाटप कशाचे करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
......
जिल्हा रुग्णालयातील ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरमधून नगरमधील काही खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा तात्पुरता पुरवठा करण्यात येत आहे. ऑक्सिजन प्लांटमधून पुरवठा लवकरच सुरळीत होईल.
- संदीप निचित
------------
औद्योगिक कारणासाठी पुरवठा बंद
जिल्ह्यातील लिक्विड ऑक्सिजन उत्पादक व रिफिलर यांना १०० टक्के साठा हा वैद्यकीय कारणासाठीच राखीव ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी चार उत्पादकांना दिला आहे. ऑक्सिजनचा वापर केवळ वैद्यकीय कारणासाठीच करावा, तसेच कोणत्याही प्रकारे बाहेरच्या जिल्ह्यात करता येणार नाही. असे आढळून आल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
-------
हे आहेत चार लिक्विड ऑक्सिजन उत्पादक
१) अहमदनगर इंडस्ट्रियल गॉस, एमआयडीसी, अहमदनगर २) हायटेक एअर प्रॉडक्टस्, एमआयडीसी, अहमदनगर ३) श्रद्धा एअर प्रॉडक्टस्, संगमनेर ४)मुनोत गॅस एजन्सी, श्रीगोंदा
-----------
गरज ६० टनाची, मिळाला १५ टन
जिल्ह्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत. एखादा बेड उपलब्ध झाला तर त्याला ऑक्सिजनचा पुरवठा नसल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. जिल्ह्यासाठी ६० टन लिक्विड ऑक्सिजनची गरज आहे. मात्र, सोमवारी रात्री १५ टन ऑक्सिजनचा टँकर मिळाला. हा टँकर जिल्हा रुग्णालयात साठविण्यात आला. तेथून हा ऑक्सिजन नगरमधील खासगी रुग्णालयांनाही देण्यात आला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, लिक्विड ऑक्सिजनचाच नगरमधील रिफिलर प्रकल्पांना पुरवठा झाला नाही. जिल्ह्यात लिक्विड उत्पादक कंपन्यांकडून येणारा ऑक्सिजन हा ५ रिफिलरमार्फत रुग्णालयांना पुरविण्यात येतो. सध्या हा ऑक्सिजन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रुग्णालयांना दिला जातो.