पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी पंचक्रोशीत सध्या कांदा लागवड जोमात असून, वीजपुरवठा मात्र कोमात असल्याने शेतकऱ्यांकडून जनरेटरची मागणी वाढली आहे. पुरेशा दाबाने वीज मिळावी, अशी मागणी या भागातील शेतकरी करू लागले आहेत.
पिंपळगाव माळवीसह परिसरातील मांजरसुंबा, डोंगरगण, जेऊर हा परिसर कांदा आगार म्हणून मागील काही दिवसांपासून ओळखला जात आहे. सध्या या परिसरामध्ये कांदा लागवड जोमात सुरू आहे. परंतु, कांदा लागवडीसाठी वीजपुरवठा खंडित असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी बरेचसे सधन शेतकरी भाडेकराराने जनरेटर वापरतात. परंतु, सर्वसामान्य शेतकऱ्यांपुढे कांदा लागवडीसाठी वीजपुरवठा हा यक्षप्रश्न बनला आहे. या जनरेटरसाठी एक दिवसाचे भाडे एक हजार रुपये असून त्यासाठी दीड हजार रुपयांचे डिझेल लागते. खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना हा अनावश्यक भार सहन करावा लागत आहे.
मागील काही दिवसांपासून पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्याचा अतिरिक्त भार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे कमीतकमी आठ तास अखंडित वीजपुरवठा व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
---
सध्या माझ्या शेतात कांदा लागवड चालू असून, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे भाडेकराराने जनरेटर आणले आहे. त्यासाठी दिवसाला दीड हजार रुपयांचे डिझेल घ्यावे लागते. लागवडीचा खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी किमान आठ तास अखंडित वीजपुरवठा देणे गरजेचे आहे.
आदिनाथ गुंड,
कांदा उत्पादक शेतकरी
----
०६ पिंपळगाव माळवी
050921\1640img_20210905_162213.jpg
खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकर्यांना भाडय़ाने जेनरेट आणून कांदा लागवड करावी लागत आहे.
छायाचित्र: खासेराव साबळे