राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विविध कार्यक्रम
अहमदनगर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात तसेच राहुरी, पारनेर व श्रीगोंद विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या तालुक्यांत २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने १९ वर्षे पूर्ण केलेल्या नवीन तरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करून घेणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे हा प्रमुख उद्देश आहे. नवीन मतदारांनी याचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
महिलेला झालेल्या मारहाणीचा निषेध
अहमदनगर: परिवहन विभागाच्या बीड येथील एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये सहायक महिलेला मारहाण करून कामावरून काढून टाकल्याचा निषेध नोंदवून, महिलेला मारहाण करणा-या व संघटनेच्या पदाधिका-यांवर खोटे गुन्हे दाखल करणा-या विभाग नियंत्रकावर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊसतोडणी कामगार वाहतूकदार मुकादम संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलदादा पाडळे, सुनील शिंदे, विनोद गायकवाड, जीवन कांबळे, हानिफ शेख, संदीप जाधव, संदीप गायकवाड, सागर चाबुकस्वार, बाळू कसबे, लखन गायकवाड, सचिन पाडळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.