लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : एका गावात आरोग्य सुविधा असली की दुसऱ्या गावातील लोकांनी तिथे जायचे आणि शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ घ्यायचा, अशीच वर्षानुवर्षे शासकीय यंत्रणेची रचना आहे. मात्र कोरोनाच्या महामारीने ही आरोग्य सुविधा किती तोकडी आहे, हेच उघड केले. सध्याच्या स्थितीलाही आठ हजार लोकसंख्येमागे एक आरोग्य केंद्र असून तज्ज्ञांअभावी गावातील लोकांना थेट शहरी भागात आरोग्य सुविधांसाठी धाव घ्यावी लागत आहे.
राज्य शासनाने गावातील लोकसंख्येप्रमाणे आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांची रचना केली. त्यामुळे प्रत्येक गावात आरोग्य सुविधा आहे, असे मुळीच नाही. एका आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी दुसऱ्या गावाला जाऊन आरोग्य सुविधा देतात. मात्र रुग्णाला गरज असेल त्यावेळी त्यालाही पायपीट करून आरोग्य केंद्र असलेल्या गावी जावे लागते. हीच स्थिती आजही जिल्ह्यातील निम्म्या गावांमध्ये आढळून येते. गत दीड वर्षांपासून कोरोना विषाणूची तीन लाख लोकांना लागण झाली. त्यात सहा हजार जणांचा बळी गेला. कोरोनाची परिस्थिती हाताळताना प्रशासकीय यंत्रणेला नाकीनऊ आले. गावातील आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना इमारती असत्या तर आज गावोगावी कोरोना सेंटर उभारण्याची किंवा शाळांमध्येच क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता भासली नसती. मात्र कोरोनाने आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे केले. जिल्ह्यातील लोकसंख्या आता ५० लाखांच्या पुढे सरकली आहे. त्या तुलनेत केवळ सहाशे आरोग्य सुविधा असलेली शासकीय आरोग्य केंद्र आहेत. म्हणजे हे प्रमाणे सात हजार लोकांमागे एक दवाखाना असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरी भागातील शासकीय व खासगी दवाखान्यांवरील ताण वाढलेला असल्याचे कोरोना काळात दिसून आले.
-----------
शासकीय आरोग्य सुविधा (२०१९-२० चा सर्वेक्षण अहवाल)
रुग्णालये-२८
दवाखाने-२८
प्रसूतिगृहे-२८
प्राथमिक आरोग्य केंद्र-१०३
उपकेंद्र-५५५
डॉक्टर-९१७
परिचारिका-४७०
----------------
खासगी आरोग्य सुविधा
खासगी रुग्णालये-१०७४
क्लिनिक-११८२
प्रसूतिगृहे-७६६
उपलब्ध खाटा-१४६६४
--------
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा (२०१९-२० चा अहवाल)
तालुका एकूण गावे आरोग्य सुविधा
अकोले १९० ८०
संगमनेर १७० ७६
कोपरगाव ८० ३८
राहाता ५८ ३६
श्रीरामपूर ५५ ३६
नेवासा १२९ ५०
शेवगाव ११२ ४३
पाथर्डी १३४ ३८
नगर १०६ ५९
राहुरी ९६ ४४
पारनेर १३१ ४८
श्रीगोंदा ११४ ४६
कर्जत १२० ३९
जामखेड ८६ २५
एकूण १५८१ ६५८
--------------------