मयत विनोद सर्जेराव मोरे (वय २२, रा. आझाद चौक, राहुरी) याचा ८ ऑगस्ट रोजी बारागाव नांदूर येथे अपघात झाला होता. अपघाताचे प्रकरण मिटविण्यासाठी विकास ऊर्फ सागर सौंदरमल याने त्याच्याकडे ३५ हजार ५०० रुपयांची मागणी केली. त्यावेळी मोरे याने ६ हजार रुपये रोख दिले. त्यानंतर आरोपीने १० ऑगस्ट रोजी विनोद मोरे याच्याकडून २० हजार रुपये रोख वसूल केले. उरलेले ९ हजार ५०० रुपयांसाठी सौंदरमल याने विनोदकडे तगादा लावला. त्याला वारंवार दमदाटी करून पैशाची मागणी केली. या त्रासाला कंटाळून विनोद मोरे याने दिनांक १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेबाबत सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र विनोद मोरे याची आई अरुणा सर्जेराव मोरे यांनी गुरुवारी (दि.२०) राहुरी पोलीस ठाण्यात हजर होऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी विकास ऊर्फ सागर प्रकाश सौंदरमल याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रजपूत हे करीत आहेत.
तगादा लावल्याने एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:25 IST