अहमदनगर : एका नाकपुडीतून श्वास आत घ्या....दुसऱ्या नाकपुडीतून श्वास सोडा....एक खोल श्वास घ्या आणि पुन्हा सोडा....ओम सूर्याय नम: असा प्राणायामाचा गजर घराघरात घुमला. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि जिल्हा पतंंजली योग समितीच्या १५० योग शिक्षकांनी ऑनलाइन वर्गाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दीड लाख नागरिकांना योगाचे धडे दिले. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत सोमवारी भल्या सकाळपासूनच नागरिकांनी घरबसल्या योग- प्राणायाम केला. ग्रामीण भागात काही ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करून मोकळ्या जागांवर नागरिकांनी योगासने केली.
आंररराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी जिल्ह्यात योग-प्राणायाम करण्यात आले. जिल्हा पतंजली योग समितीच्या ५० योग शिक्षकांनी नगर शहरात आणि ५० शिक्षकांनी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ऑनलाइन योग शिकविला. यामध्ये काही शाळांनीही सहभाग घेतला होता. शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन योग वर्गाची लिंक पाठवली. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही या उपक्रमात सहभागी होता आले. ग्रामीण भागात विविध संघटनांनी कमी संख्येच्या उपस्थितीत व सामाजिक अंतर राखून योगासने केली. प्रत्यक्ष योगासने करण्यात आली, अशी माहिती पतंजली योग समितीचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब निमसे यांनी सांगितले.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ५० प्रशिक्षकांनी पाच टप्प्यात ऑनलाइन योगा, प्राणायाम आणि ध्यान शिकवले. यामध्ये तब्बल एक लाख नागरिकांनी सहभाग घेतला, अशी माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगचे नगरचे प्रशिक्षक कृष्णा पेंडम यांनी सांगितले. सकाळी सहा ते दहा अशा दोन टप्प्यात ऑनलाइन योगासने करण्यात आली, तर काही नागरिक, खासगी कंपन्यांमधील कर्मचारी सायंकाळी होणाऱ्या दोन टप्प्यातील ऑनलाइन वर्गांना सहभागी होणार आहेत.
सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवरून योगासन वर्ग लाईव्ह करण्यात आले होते. एक दिवस आधीपासून शासकीय अधिकारी, कर्मचारी, शाळा, शिक्षक, विद्यार्थी, खासगी कंपन्यांमधील कर्मचारी यांना ऑनलाइन वर्गाच्या लिंक पाठविण्यात आल्या होत्या. अनेकांनी निसर्ग रम्य वातावरणात योग-प्राणायाम केला.
----------------
एक दिवस नव्हे रोज करा योग
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आरोग्याबाबत सजग झाले आहेत. रोग प्रतिकारशक्ती, फुफ्फुसाची क्षमता वाढविण्यासाठी योग, प्राणायाम करण्याची गरज आहे. त्यामुळे एक दिवस नव्हे तर रोज योग-प्राणायाम करा. शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी, जीवन आनंदी-समृद्ध करण्यासाठी योग करा, असे आवाहन योग शिक्षकांनी त्यांच्या ऑनलाइन संवादातून केले. योगा डान्स करून अनेकांनी या वर्गाचा आनंदही घेतला.
----------
फोटो