श्रीगोंदा : राष्ट्रीय महामार्गाच्या काष्टी व श्रीगोंदा शहरातील भुयारी गटार, नगर-दौंड लोहमार्गावर लिंपणगाव गेटवर उड्डाणपूल पुलाचे अंदाज पत्रक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. श्रीगोंदा शहरात महामार्गाच्या कामात येणारे अडथळे नगरसेवक व प्रशासनाने एकत्र येऊन सोडवावेत, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
श्रीगोंदा पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, अण्णासाहेब शेलार, भैया लगड, केशव मगर, दिनकर पंधरकर, शहाजी हिरवे, आर. के. पवार, सिद्धेश्वर देशमुख, बाळासाहेब गिरमकर, प्रतिभा झिटे उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५१६ व ५६१ च्या भूसंपादनापोटी शासनाने दिलेले पैसे १० ऑगस्टपूर्वी संबंधित शेतकऱ्यांनी स्वीकारावेत. नाही तर हे पैसे न्यायालयात भरून भूसंपादनची प्रकिया पूर्ण केली जाईल, असे विखे यांनी सांगितले. बाळासाहेब महाडीक यांनी भानगाव-वडाळी रस्ता शिवेवर एका शेतकऱ्याने अडविला आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. विखे म्हणाले, मोजणी करून हा प्रश्न निकाली काढावा, अशा सूचना केल्या. यावेळी गायत्री ढवळे, अनिल ठवाळ, सतीश मखरे, आदेश शेंडगे, बाळासाहेब नलगे, टिळक भोस, दीपक शिंदे यांनी समस्या मांडल्या.
सुरुवातीला विखे यांनी काष्टी ते श्रीगोंदा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी करून नागरिकांच्या भावना समजून घेतल्या. पेडगाव येथील बहादूरगडास भेट दिली. आर. के. पवार यांच्याकडे पाहुणचार घेतला.
----
नगर जिल्ह्यात सर्वाधिक वाळूचोर
पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब नलगे यांनी श्रीगोंद्यात वाळू चोरीमुळे वाळू महाग झाली आहे. वाळूचे लिलाव काढले तर वाळू स्वस्त होईल, असे म्हटले. त्यावर विखे म्हणाले, महसूलमंत्री जिल्ह्यातील आहेत. असे असताना जिल्ह्यात सर्वाधिक वाळूचोर आहेत. हे दुर्दैव आहे. कोरोना संपल्यावर याविरोधात उपोषण करणार आहे.
---
१० श्रीगोंदा विखे
श्रीगोंदा येथील आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार डॉ. सुजय विखे.