शेवगाव : नगरपरिषद निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या हरकती, सूचनांवर काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असल्याने राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्धीची तारीख अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
राज्य निवडणूक आयोग केव्हा तारीख जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपरिषदेची होऊ घातलेली निवडणूक निवडणूक आयोगाच्या पुढील आदेशापर्यंत लांबली आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग व पुढे पावसाचे चार महिने यामुळे निवडणुका लांबणार, असे दिसत आहे. निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून येथील एकवीस प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले होते. प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर आक्षेप, हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार १४ हजार ५८६ मतदारांनी हरकती नोंदवल्या होत्या. शहरातील २१ प्रभागातील ३१ हजार ४५० मतदारांपैकी जवळपास निम्म्या मतदारांनी हरकती घेतल्याने नगरपरिषद प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार याद्यांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, हरकतीची संख्या लक्षात घेता हातातील कामे बाजूला सारत अधिकाऱ्यांनी त्याचा निपटारा सुरू केला होता.
अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी व मतदान केंद्रांची प्रसिद्धी आगामी काही दिवसांत केली जाणार होती. या महिन्यात केव्हाही निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो. या आशेवर एकवीस प्रभागातील सर्वच पक्ष, आघाड्या व अपक्ष याप्रमाणे दोनशेच्यावर उमेदवार मतदारसंघात फिरू लागले होते. मतदारांशी जनसंपर्क वाढला होता. विचारपूस वाढली होती. तर काहींनी दोन-दोन प्रभागांतून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती. मतदारांना प्रभावित करण्यासाठी विविध प्रयोग करण्यास सुरुवात झाली होती.
आगामी निवडणूक लढवायची, जिंकायची व नगरसेवक बनायचेच, असा चंग अनेक उमेदवारांनी बांधला होता. नगरसेवकानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतीपदी बसण्याची स्वप्ने काहींना पडू लागली होती. मात्र, आता या निवडणुका लांबल्याने त्यांची स्वप्ने विखुरली आहेत.
--
नगर परिषदेवर प्रशासकराज..
निवडणूक लांबल्याने प्रशासकीय राजवट आणखी काही महिने तरी कायम राहणार आहे. गतकाळात काही निर्णय प्रतिनिधींच्या आगमनापर्यंत रोखून ठेवण्यात आले होते. त्या सर्वांना आता गती मिळण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यापासून पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आठ-दहा दिवसांआड होणारा नळयोजनेचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने वेगाने उपाययोजना कराव्या लागणार आहेत. मुख्य रस्त्यासह रस्त्यांंवरील अतिक्रमणे, स्वच्छतेबाबत शिस्त लावणे आदी कामांकडे प्रशासकांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.