सुपा : पारनेर तालुक्यातील सर्वात मोठ्या वर्दळीचे गाव असलेल्या सुपा गावामध्ये शून्यावर आलेली रुग्णसंख्या मंगळवारी वाढली. त्यामुळे अनलॉक झाल्यानंतर याचा फटका पुन्हा सुपा गावाला बसतो की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
सोमवारी (दि.७) करण्यात आलेल्या ५१ रॅपिड अँँटिजेन टेस्टमध्ये कामरगाव येथील २, शहंजापूर, पिंप्री गवळी व बाबूर्डी येथे प्रत्येकी एक असे एकूण ५ रुग्ण आढळून आले होते, असे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विद्या बारवकर यांनी सांगितले. असे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विद्या बारवकर यांनी सांगितले. सुपा गावात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, मंगळवारी केलेल्या रॅपिड अँँटिजेन टेस्टमध्ये सुप्यातील ४ जण बाधित आढळून आले. या ४ रुग्णांना भाळवणी कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यासाठी निर्देश दिले असून बुधवारी (दि.९) त्यांच्या संपर्कातील संशयितांची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे आरोग्यसेविका अंजली वरपे यांनी सांगितले.
अनलॉक केल्याच्या दुष्परिणामांची झळ सुपा गावाला सहन करावी लागते की काय अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत होऊ लागली आहे. सुपा हे परिसरातील गावांचे बाजाराचे केंद्र असल्याने येथे मोठी गर्दी होते. ग्रामस्थ शासकीय नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे पुन्हा कोरोना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापुढील काळात खबरदारीच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. अन्यथा आगामी काळात पुन्हा कडक लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार आहे, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
............
फोटो ओळी : सुपा येथे नियम पायदळी तुडवून ग्रामस्थ बेफिकीर फिरताना दिसत आहेत.