अहमदनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. रविवारी तब्बल ४४९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या ८० हजारांच्या वर गेली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही २ हजार २२७ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात रविवारी ३२५ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७७ हजार ३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७७ टक्के इतके झाले आहे. रविवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १५९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६७ आणि अँटिजेन चाचणीत २३ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (१५६), जामखेड (६), कोपरगाव (४५), नगर ग्रामीण (१६), नेवासा (११), पारनेर (२३), पाथर्डी (१६), राहुरी (१५), संगमनेर (५३), शेवगाव (१७), श्रीगोंदा (१८), श्रीरामपूर (१५), अकोले (५), राहाता (४७) आणि इतर जिल्हा (३), कन्टोन्मेंट (१) अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यंत्रणांना दिले आहेत. यासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. तसेच कोविड केअर सेंटर सज्ज करण्यात येत आहेत.
-----------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : ७७०३०
उपचार सुरू असलेले रुग्ण : २२२७
मृत्यू : ११७२
एकूण रुग्णसंख्या : ८०४२९