तालुक्यात पूर्वी आदिवासी महामंडळाच्या मार्फत एकाधिकार पद्धतीने हिरडा खरेदी केला जात असे, आता शेतकऱ्यांनाच्या मागणीनुसार धान (भात) खरेदी केले जाणार आहे. यामुळे धान पिकास योग्य हमीभाव मिळण्यास मदत होणार असून व्यापाऱ्यांकडून होणारी खरेदीतील लूट थांबेल, अशी अपेक्षा आहे.
तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्टा म्हणजे धान पिकाचे आगर असून येथे एकाधिकार पद्धतीने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी अनेक दिवसांची मागणी होती. आदिवासी शेतकरी वर्गाची ही मागणी निधीअभावी रखडली होती. निधीचा प्रश्न मार्गी लागला असून, येत्या आठ दिवसांत कोतुळ व राजूर येथील गोडाऊनमध्ये खरेदी केंद्र सुरू होणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ.लहामटे यांनी केले आहे.
कोट -
धान खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून, तसे आदेश जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मिळाले आहेत. अकोले व जुन्नर तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी आयसीआयसीआय बँकेत उत्पादक शेतकऱ्यांचे खाते उघडण्यात येत आहे. या भागात प्रथमच हे केंद्र सुरू होत असून अधिकारी, कर्मचारी वर्गास प्रशिक्षण देणे सुरू आहे.
- सागर पाटील, अधिकारी आदिवासी विकास महामंडळ