अहमदनगर : नगर तालुका दूध संघाने कर्मचाऱ्यांची देणी रकमेबाबत बनावट आर्थिक पत्रके तयार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून, त्यास संचालक मंडळ जबाबदार आहे. त्यामुळे दूध संघाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाला पदावरून दूर का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस नाशिक उपविभागीय निबंधकांनी दूध संघाला बजावली आहे.
कामगार संचालक तथा माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी याबाबत तक्रार केली आहे. सदर तक्रारीवरून वरील कारवाई करण्यात आली आहे. नोटिसीचा खुलासा करण्यासाठी संचालक मंडळाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. याबाबत शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दूध संघाच्या संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांची ८ कोटींची देणी ताळेबंदातून नष्ट केली आहे. याची चौकशी होऊन आयकर चोरीसाठी खोटी विवरणपत्रे दाखल करून शासनाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे ही चौकशीही धीम्या गतीने सुरू आहे. यापूर्वी सन २००५ ते २००७ या कालावधीत २ कोटी २ लाखांचा अपहार केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल झालेला आहे. औद्योगिक न्यायालयाने सन २०१३ मध्ये दिलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांची देणी व्याजासह देण्याची तरतूद केली होती. त्याचे लेखापरीक्षणही करण्यात आले होते; परंतु ही देणी बेकायदेशीररीत्या नष्ट करून चोरी केली आहे. सदर देणी अदा करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली होती. संघाचे पाच वर्षांचे लेखापरीक्षण लेखा परीक्षक बाळासाहेब मुसमाडे यांनी केले. त्यांनी संचालक मंडळाला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे; परंतु यापूर्वीच्या निबंधकांच्या ही बाब निदर्शनास आली असून, त्यांनी गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे, तसेच त्यानंतरचे निबंधक सुनील परदेशी यांनीही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे मत ओ. संचालक मंडळ बरखास्त करण्याबाबत नोटीस बजावली असल्याचे कामगार संचालक तायगा शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.