रुईछत्तीसी : नगर तालुक्यातील नगर-सोलापूर रस्त्यावरील मोठ्या लोकसंख्येचे गाव असलेल्या रुईछत्तीसी येथे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्तेही पुढाकार घेत नसल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली आहे.
रुईछत्तीसी गावावर परिसरातील वडगाव, तांदळी, वाटेफळ, दहिगाव, साकत, अंबिलवाडी, मठपिंप्री, हातवळण, तसेच बीड जिल्ह्यातील जवळपास ६ ते ७ गावे अवलंबून आहेत. येथील जनता आणि पुढारी कोणत्याच गोष्टीत मागे नसतात. मग ते सामाजिक, धार्मिक कोणतेही कार्य असो. परंतु, कोरोना काळात रूई सारख्या गावात कोविड सेंटरची गरज असताना ठोस पावले उचलताना कोणीच दिसत नाही. रूई सारख्या गावातील तालुक्यात नि जिल्ह्यात पोहोचलेल्या पुढाऱ्यांनी कोविड सेंटर चालू करण्यासाठी पुढाकार घेतला तर आम्ही पंचक्रोशीतील सर्व जनता आपल्या खंबीरपणे पाठीशी उभी आहे, ती मदत करण्यासाठी तयार आहोत अशी आर्त हाक जनतेने दिली आहे.
रुई सारख्या ठिकाणी कोविड सेंटर चालू झाले तर ते आपल्या घरच्यासारखे नि सर्व रुग्णांना आधार देणारे ठरणार आहे. येथे दोन मोठी महाविद्यालये आहेत. या विद्यालयात प्रशस्त जागाही आहे. राजकीयदृष्ट्या या गावचे वजन जिल्हा पातळीवर म्हणावे तेवढे चांगले असल्याने गावातील सर्व आजी-माजी पुढाऱ्यांनी कोविड सेंटरसाठी एकत्र यायला हवे. गावासह शेजारील गावांनी पाच पंचायत समिती सदस्य निवडून दिले आहेत. त्यांना राजकीय व प्रशासकीय अनुभव आहे. त्या सर्वांनी आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करुन कोविड आरोग्य सेंटरसाठी पुढाकार घेतला पाहिजे. गावातील आजी-माजी सरपंच यांनीही त्यांना सहकार्य केले पाहिजे. राजकारण बाजूला ठेवून लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. कोरोना रुग्णांना बेड मिळवून देण्यापासून तर त्याचा डिस्चार्ज होईपर्यंत सर्व पुढारी, सामाजिक कार्यकर्ते त्याला आधार देतात. आता कोविड सेंटर उभारुन आधार देण्याची गरज आहे.