श्रीगोंदा : कोरोना हे जागतिक संकट आहे. आपला जीव वाचविण्यासाठी लाॅकडाऊन हाच एकमेव उपाय आहे. १ मे पर्यंत कडक लाॅकडाऊन करा. कोरोनावर कोणीही राजकारण करू नये. राजकारण करण्यासाठी पुढे दिवस आहेत, असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना लगावला.
मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शनिवारी छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आढावा बैठक झाली. कुकडीचे आवर्तन २५ एप्रिलला सोडावे या मागणीचे निवेदन मारुती भापकर राजेंद्र म्हस्के यांनी दिले.
थोरात पुढे म्हणाले, शासन कोरोनाच्या महामारीत आधार मदत करण्याची भूमिका घेत आहे. नागवडेंनी श्रीगोंद्यात कोरोना सेंटर सुरू केले ही चांगली बाब आहे. कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांनी होमक्वारंटाईन होण्याऐवजी हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचार करावेत. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन, इतर औषधे व लस उपलब्ध करण्याचा प्रयत्न चालू आहे.
आमदार बबनराव पाचपुते म्हणाले, कोरोना काळात शासनाने सतर्क राहण्याची गरज होती. निधी उपलब्ध करणे आवश्यक होते. तहसीलदार प्रदीप पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली टिम चांगले काम करीत आहे. आमदार निधीतून दोन रुग्णवाहिका, दोन व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहे. परिक्रमात कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी आहे.
नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांची जबाबदारी आहे. ज्ञानदीप व छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यालयात कोविड हेल्थ सेंटरसाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी आहे.
प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि उपचाराबाबत येत असलेल्या अडचणी सांगितल्या.
यावेळी आमदार सुधीर तांबे, घनश्याम शेलार, दीपक भोसले, माजी आमदार राहुल जगताप, बाळासाहेब सांळुके, अनुराधा नागवडे, ज्ञानदेव वाफारे, दीपक नागवडे, शुभांगी पोटे, बाबासाहेब भोस, अतुल लोखंडे, स्मितल वाबळे, मनोहर पोटे, संदीप नागवडे, प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार, अप्पर तहसीलदार चारुशीला पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले उपस्थित होते.
सूत्रसंचालन नंदकुमार पवार यांनी केले.
...
फोटो-१७श्रीगोंदा थोरात
...
ओळी-श्रीगोंदा येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना थोरात. समवेत आमदार बबनराव पाचपुते आदी.