अहमदनगर : महापालिकेच्या प्रभाग तीनची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा सेनेने ठेवलेला प्रस्ताव राष्ट्रवादीने फेटाळून लावला. मनसेच्या वैभव सुरवसे यांनी माघार घेतल्याने तिरंगी लढत होणार आहे. १७ एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. सेनेकडून प्रतिभा विजय भांगरे तर राष्ट्रवादीकडून कृष्णा गायकवाड तसेच अपक्ष म्हणून अनिता दळवी असे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भांगरे, गायकवाड, दळवी आणि मनसेचे सुरवसे अशा चौघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी माघारीचा शुक्रवारी अखेरचा दिवस होता. सेनेने सुरवसे यांना माघारीसाठी विनंती केली. सुरवसे यांनी त्याला मान देत माघार घेतली. राष्ट्रवादीने गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. विजय भांगरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत प्रतिभा भांगरे यांना सेनेने उमेदवारी दिली आहे. भांगरे यांच्यासाठी सहानुभूती म्हणून राष्ट्रवादीने माघार घेऊन निवडणूक बिनविरोध करावी, असा प्रस्ताव सेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यासमोर मांडला. जगताप यांनी पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून ठरवू, असे सांगितले. मात्र, माघारीची मुदत संपेपर्यंत त्यांचा कोणताच निरोप सेनेला आला नाही. सेनेने ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, ते निष्फळ ठरले. रिंगणात आता तीन उमेदवार राहिले असून शनिवारी चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
बिनविरोधचा प्रस्ताव राष्ट्रवादीने फेटाळला
By admin | Updated: April 2, 2016 00:35 IST