कर्जत : कर्जत तालुक्यातील भाजपचे नेते, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी गुरुवारी सकाळी त्यांच्या समर्थकांसह मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका उषा राऊत, हर्षदा काळदाते, भाजपचे तालुका उपाध्यक्ष रामदास हजारे, अमृत काळदाते, किरण पाटील, महादेव खंदारे, बजरंग कदम, उमेश जपे, मंगेश नेवसे, धनंजय थोरात आदींनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, शहराध्यक्ष सुनील शेलार, विशाल मेहेत्रे, नगरसेवक बापूसाहेब नेटके, लालासाहेब शेळके, भास्कर भैलुमे आदी उपस्थित होते.
नामदेव राऊत यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, हे जवळपास निश्चित होते. अखेर त्यांनी गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कर्जत-जामखेड तालुक्यातील एक मोठा नेता राष्ट्रवादीत आला आहे. तसेच यापूर्वीही कर्जतचे काही नगरसेवक राष्ट्रवादीत आले आहेत. यामुळे आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीत नेमकी कोणती राजकीय समीकरणे बदलणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, तसेच यापुढे तालुक्यातील भाजपचे कोणकोणते नेते, कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या गळाला लागतात, याकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे.
----
२३ नामदेव राऊत
कर्जत येथील भाजप नेते नामदेव राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले.