श्रीगोंदा : नगरविकास विभागाच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२१ अंतर्गत ‘माझी वसुंधरा’ अभियानाला श्रीगोंदा शहरात सोमवार (दि.७)पासून प्रारंभ होणार आहे. सकाळी आठ वाजता संत शेख महंमद महाराज मंदिर परिसरात अभियानाला सुरुवात होईल, तर बुधवारी (दि.३०) ईदगाह मैदानावर सांगता होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांनी दिली.
यावेळी उपनगराध्यक्ष रमेश लाढाण, मुख्याधिकारी मंगेश देवरे आदी उपस्थित होते.
या अभियानात शहरातील तहसील कार्यालय, बाजारतळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, सिद्धेश्वर घाट, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, जोधपूर मारुती चौक, नगरपालिका परिसर, बसस्थानक व ईदगाह मैदानाची साफसफाई करण्यात येणार आहे. या अभियानात सर्व पक्षांतील राजकीय नेते, सामाजिक संस्था, व्यापारी, विद्यार्थी, तरुण मंडळातील कार्यकर्ते, तसेच शासकीय सेवक सहभागी होणार आहेत.