जामखेड : पैशाच्या कारणातून एका तरुणाचा खून करण्याची घटना जामखेड शहरात घडली. ही घटना गुरुवारी (दि.२५) घडली असून, याबाबत मृत तरुणाच्या आईने जामखेड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.२७) रात्री फिर्याद दिली असून, एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
दिगंबर जालिंदर काळे (वय ३०, रा. चुंबळी, जामखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मुलाची आई मुक्ताबाई जालिंदर काळे (रा.राजेवाडी, ता.जामखेड) यांनी याबाबतची फिर्याद दिली. खंड्या रावसाहेब काळे (रा.मिलिंदनगर, जामखेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास किरण काळे याने सोजर कंठीलाल पवार (रा. खंडोबा वस्ती, जामखेड) यांच्या घरातील पैसे कोठे ठेवले, असे म्हणत दिगंबर काळे यास मारहाण केली. नंतर दिगंबरला मोटारसायकलवर बसवून जामखेड शहरातील खर्डा चौकाजवळील बाजूस घेऊन गेला. कोणत्या तरी हत्याराने दिगंबरला मारहाण करून खून केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राजू थोरात करीत आहेत.