अहतदनगर: महापालिकेच्या वतीने कोविड मिशन झीरो राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यावर प्रशासनाने भर दिला असून, सोमवारपासून शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चाचण्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे.
नगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. शनिवारी नगर शहरात २० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. महापालिकेने कोविड रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यासाठी पावले उचलली आहेत. महापालिकेत शहरात सात आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रांतर्गत येणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यासाठी प्रत्येकी एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके दुकानातील कामगार, भाजी व फळे विक्रेत्यांची चाचणी करत आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढत असून, पुढच्या टप्प्यात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतून चाचणी करण्यास सुरुवात केली जाणार आहे.
.....
- शहरात कोविड मिशन झीरो राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने दुकानदार, कामगार, भाजी व फळे विक्रेत्यांची चाचणी करण्यात येत असून, सोमवारपासून शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चाचण्या करण्यात येणार आहेत. तसे आदेश आरोग्य विभागांना देण्यात आले आहेत.
- शंकर गोरे, आयुक्त, महापालिका