कर्जत : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व कर्जत तालुका आरोग्य विभागाच्या वतीने कर्जत तालुक्यातील नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या म्युकरमायकोसिस समुपदेशन व मार्गदर्शन शिबिरात ५८ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. वैभव मदने, दंत चिकित्सक डॉ. साकेत जगदाळे, दंत चिकित्सक डॉ. किरण शेंडे, नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रिया दराडे-बडे आदींनी म्युकरमायकोसिसची लक्षणे असलेल्या नागरिकांची तपासणी केली. तसेच या रोगाची नेमकी लक्षणे काय आहेत, नेमकी काय व कशी काळजी घ्यावी, याबाबत शिबिरात रुग्णांना मार्गदर्शन करून समुपदेशन करण्यात आले.
सध्या तालुक्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाची आकडेवारी कमी झाली असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव होऊ नये, या नव्या आजारात नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये, यासाठी आमदार पवार यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे रझ्झाक झारेकरी, डॉ. शबनम इनामदार, भास्कर भैलुमे, सचिन कुलथे, सतीश पाटील आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
..........
फाेटो ओळी : कर्जत येथे म्युकरमायकोसिसची तपासणी करताना आरोग्य पथक.