कोपरगाव : कोपरगाव तहसील कार्यालयाच्या पाच लाखांच्यावर थकीत वीजबिलापोटी महावितरण विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.२५) दुपारी २ वाजताच्या सुमारास वीजपुरवठा खंडित करून तहसील कार्यालयाला झटका दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोपरगाव तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय व तहसीलदार निवासाचे थकीत वीजबिल सर्वाधिक असल्याने कोपरगाव येथील महावितरण विभागाने महसूल विभागाला वारंवार प्रत्यक्ष भेटून लेखी व तोंडी सांगूनही वीजबिलाची थकीत रक्कम न भरल्याने अखेर वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून वीजपुरवठा खंडित केल्याची माहिती महावितरणच्या कोपरगाव कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवंत खराटे यांनी सांगितले.
थकबाकीमध्ये तहसील कार्यालयातील दोन मीटरची तीन लाख ९० हजार ४३० रुपये आणि एक लाख १५ हजार १४०, तहसीलदार निवास १९ हजार ५४० व तलाठी कार्यालय १४ हजार २० रुपये अशी एकूण चार वीज प्रवाहित मीटरची पाच लाख २७ हजार १३० रुपये इतकी उच्चांकी थकबाकी असल्यामुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागला, असेही खराटे यांनी सांगितले.
यासंदर्भात तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले, वीजवितरण विभागाची थकबाकी देणे बाकी आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय वरिष्ठ पातळीवरून थकीत वीजबिल भरण्यासाठी अपेक्षित अनुदानाची रक्कम न आल्यामुळे हे वीजबिल भरता आले नाही. ते लवकरच भरण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र, महावितरण विभागाकडूनसुद्धा महसूल विभागाला करापोटी दोन लाख २१ हजार रुपयांची थकबाकी येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
--