श्रीरामपूर : गेल्या १० वर्षांमध्ये देशात जेवढे काम झाले तेवढे कधी झाले नाही. महाराष्ट्रात आज जो काही विकास दिसतो, तो काँग्रेसच्याच नेतृत्वाखाली झाला. सर्व विकासाचे श्रेय काँग्रेसलाच आहे. काँग्रेसने काय केले? असे विचारणारांना दिवसभर हेलिकॉप्टरमधून फिरणाऱ्या पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर, रस्ते, काश्मीर ते कन्याकुमारी रेल्वे, कारखाने हे काँग्रेसच्याच काळात झाल्याचे दिसत नाही का? असा सवाल करीत पूर्वीचे काँग्रेस पंतप्रधान कमी बोलायचे व जास्त काम करायचे. तर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुसतेच बोलत आहेत, काम काहीच करीत नाहीत, ते बडबोले पंतप्रधान आहेत, अशी टीका माजी केंद्रीयमंत्री गुलामनबी आझाद यांनी येथे केली.गुरूवारी दुपारी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे अध्यक्षस्थानी होते. आझाद म्हणाले, आमचे पंतप्रधान काम करीत होते. बोलत नव्हते. आजचे पंतप्रधान फक्त बोलतात. काम मात्र काहीच करीत नाहीत. ते सभांमध्येच बोलतात. सभा नसतील तेव्हाही रेडिओ, टी.व्ही.वरून बोलतच असतात. बोलणे बंद केले नाही तर ते काम करणार कधी? आम्ही २०/२० तास प्रचंड काम केले. काम करण्यात काँग्रेस हिरो तर मार्केटिंगमध्ये झिरो ठरली. भाजपाने काम न करता मार्केटिंग केले. मार्केटिंगमध्ये आम्ही कमी पडलो. तर ते भारी भरले. संपूर्ण देशाला आज काँग्रेसची गरज आहे. आजसारखी देशाला काँग्रेसची कधी आवश्यकता भासली नाही. काँग्रेस हा देशाचा इतिहास आहे. तो नष्ट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. जगात काँग्रेस सोडून एकही पक्ष नाही, ज्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज त्याच पक्षाविरूद्ध काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला जातो, हे दुर्दैव आहे. सर्वधर्मीयांचा भारत हा एक स्वर्ग आहे. पण जातीयवादी पक्ष या स्वर्गाला नरक बनवायला निघाले आहेत. ६५ वर्षात देशात काही झाले नाही असे भाजपावाले म्हणतात तर हेलिकॉप्टर, रस्ते, कारखाने, रेल्वे हा सारा विकास भाजपावाल्यांनी ६ महिन्यात केला का? असा सणसणीत टोलाही आझाद यांनी हाणला.माजी उपनगराध्यक्ष अंजूम शेख, उमेदवार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा राजश्री ससाणे, सचिन गुजर, मुरली राऊत, अरूण नाईक आदींची भाषणे झाली. नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)राष्ट्रवादी सोबत नसल्याची खंतसर्व विकासाचे श्रेय काँग्रेसलाच आहे. शिवसेना,भाजपा, मनसेचा विकासाशी काही संबंध नाही. आज या जातीयवादी पक्षांविरूद्ध लढण्यासाठी समविचारी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत राहणे आवश्यक होते. पण त्यांनीही त्यांचे दुकान थाटले, अशी खंतही आझाद यांनी यावेळी व्यक्त केली.
मोदी बडबोले पंतप्रधान
By admin | Updated: October 10, 2014 00:23 IST