कोपरगाव : शिक्षक पिढी घडवतो, तर शेतकरी जगाचे पोटभरण करतो. कोपरगाव तालुक्यातील शेतकरी आधुनिकतेची कास धरणारे असून, सोयाबीन उत्पादन वाढ, विस्तार, विविध बीजप्रक्रिया, एकात्मिक खत व कीड नियंत्रण इत्यादींमध्ये निपूण झाले आहेत, असे तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी सांगितले.
कोपरगाव तालुक्यातील धारणगाव-मुर्शतपूर येथील रामभाऊ शिंदे यांच्या वस्तीवर ऊस शेतीशाळा शेतकरी शिक्षक दिन अनोख्या पद्धतीनने साजरा केला. तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांची बदली झाल्याने त्यांच्या कृषी मार्गदर्शनातून उतराई होण्यासाठी रविवारी (दि.५) त्यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी राष्ट्रीय कीर्तीचे ऊसतज्ञ डॉ. ज्ञानदेवराव हापसे यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. देवेंद्र रासकर यांनी त्यांच्या कार्याची माहिती देत तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्याबद्दल आठवणी सांगितल्या. जळगाव येथील सहाय्यक प्राध्यापक व कृषितज्ज्ञ पोपटराव खंडागळे यांनी ऊस बीजप्रक्रिया, संतुलित व एकात्मिक खत व्यवस्थापन, पानवेल अभ्यास व व्यवस्थापन इत्यादीबाबत माहिती देत पीक उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन केले.
आढाव म्हणाले, शेतीत प्रयोग करत राहणं आणि त्यातून उत्पादन वाढ शिकणं हा मौलिक संस्कार कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी जपला आहे. कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या दारात येऊन मार्गदर्शन देत आहे. शेतकऱ्यांनी या ज्ञानाचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मुर्शतपूरच्या सरपंच साधना दवंगे, धारणगावचे सरपंच नानासाहेब चौधरी, कृषी सहाय्यक तुषार वसईकर, प्रशांत बागल, कृषी पर्यवेक्षक राजेश तुंभारे, मंडल कृषी अधिकारी अविनाश चंदन, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, राधा शिंदे, जालिंदर शिंदे, बापूसाहेब शिंदे, सचिन शिंदे, सुनील दवंगे, संजय उगले, माणिक शिंदे, महेश तिपायले उपस्थित होते. संगीता सोळसे यांनी आभार मानले.
--------------
फोटो०६ : कृषी अधिकारी आढाव सत्कार – कोपरगाव
धारणगाव मुर्शतपूर येथील शेतकऱ्यांनी शिक्षक दिन अनोख्या रीतीने साजरा करत तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांचा सत्कार केला.
060921\1630910964767_img-20210905-wa0064-1.jpg
फोटो०६ : कृषी अधिकारी आढाव सत्कार – कोपरगाव