अहमदनगर : सावेडी परिसरात मोबाईलची चोरी करणारी एक टोळी तोफखाना पोलिसांच्या गळाला लागली आहे. या टोळीतील तिघांना अटक केली असून त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. दोघा आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचे पाच मोबाईल आणि एक मोटारसायकल चोरीला गेली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासामध्ये टोळीचा पोलिसांना शोध लागला.तिघांची चौकशी केली असता त्यांच्याकडून चोरी गेलेले पाच मोबाईल आणि एक मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. विशाल फ्रान्सीस कदम (वय १९) आणि उषा फ्रान्सीस कदम (वय ३५, दोघे रा. पाथरी बुद्रूक, ता. राहाता) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. दोघे आरोपी आई-मुलगा असून तिसरा आरोपी अल्पवयीन आहे. पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांच्या विशेष पथकाने ही कारवाई करून तिघांना अटक केली आहे. शहरामध्ये मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे होत असलेल्या चौकशीत आणखी काही चोऱ्या निष्पन्न होण्याची शक्यता आहे. दोघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.(प्रतिनिधी)
मोबाईल चोरणारी टोळी पकडली
By admin | Updated: September 22, 2015 00:21 IST