केडगाव : आई, आजी, बाबा तोंडाला मास्क लावा.. हाताला सॅनिटायझर लावा.. रांगेत अंतर ठेवून पुढे चला.. तुमचं काम लगेचच होईल कळाजी करू नका, असे डॉक्टरांचे आपुलकीचे चार शब्द कानावर पडताच वयोवृद्धांना आनंद झाला. त्यांना हवा असणारा कागद हातात पडला आणि त्यांना हायसे वाटले.
प्रसंग होता वयोवृद्धांना ग्रामीण रुग्णालयाकडून मिळणाऱ्या वयाच्या दाखल्याबाबतचा...
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ६५ वर्षांपुढील वयोवृद्धांना श्रावणबाळ योजनेचा तर विधवांना व परित्यक्त्या आणि दिव्यांग असणाऱ्या निरक्षर व्यक्तींना पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी वयाचा दाखला आवश्यक असतो, हे दाखले जिल्हा रुग्णालयातून मिळतात. परंतु, कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या ९ महिन्यांपासून ते काम बंद होते. सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष सिद्धांत आंधळे यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुनील पोखरणा यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यांनी त्याची दखल घेऊन तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयाकडून दाखले देण्याचे आश्वासन दिले होते.
कामरगाव (ता.नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी स्वतंत्र वाहनव्यवस्था करून गावातील वृद्धांना व दिव्यांगांना चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय निकम, डॉ. प्रतीक सरदार व कार्यालयीन लिपिक सचिन तोडमल यांनी सहकार्य करून सर्वांना वयाचे दाखले दिले. त्यामुळे निराधार, वयोवृद्ध व दिव्यांगांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले.
यावेळी तुकाराम कातोरे यांच्यासह सुनील चौधरी, सुयोग भुजबळ, शिवाजी झरेकर, चंदर गोरे, जुलेखा शेख, साहेबराव ठोकळ यांच्यासह गावातील अनेक वयोवृद्ध व दिव्यांग उपस्थित होते. कामरगाव येथील कार्यकर्त्यांनी राबविलेला उपक्रम स्तुत्य व प्रेरणादायी आहे.
कोट..
कामरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी एकाच वेळी वयोवृद्धांना आणून त्यांची वेळ व पैसा वाचविला. असे काम इतर गावांतील कार्यकर्त्यांनी केले तर निराधारांना आधार मिळेल व आम्हालाही त्यांचे काम करण्यात आनंद वाटेल.
-डॉ. संजय निकम,
वैद्यकीय अधिकारी, चिचोंडी पाटील