कोपरगाव : कोपरगाव शहराला नगरपरिषदेच्यावतीने दहा ते बारा दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला आहे. त्याचा विरोध करत भाजप, शिवसेना, आरपीआयच्या वतीने पालिकेत सोमवारी (दि.१९) मटका फोडो आंदोलन करण्यात आले आहे.
आंदोलकांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे, आमदार आशुतोष काळे यांचा घोषणाबाजी करीत निषेध केला. यावेळी भाजप नेते पराग संधान, उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, गटनेते रवींद्र पाठक, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, शहराध्यक्ष दत्ता काले, माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई, नगरसेविका विद्या सोनवणे, विजय आढाव, शिवाजी खांडेकर, विनोद राक्षे, जितेंद्र रनशूर, अशोक लकारे, हर्षदा कांबळे, मंगल आढाव, वैशाली सोनवणे, योगेश बागुल, ताराबाई जपे, पिंकी चोपडा, दीपा गिरमे, दिनेश कांबळे, शिल्पा रोहमारे, रवींद्र रोहमारे, सत्यन मुंदडा, महावीर दगडे आदी उपस्थित होते.
भाजप नेते पराग संधान म्हणाले, शहरातील महिलांची पाण्याची परवड थांबावी व त्यांच्या डोक्यावरील हंडा खाली यावा म्हणून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडे पाणी योजना मंजूर करून आणली. मात्र, काही विघ्नसंतोषी लोकांमुळे ही योजना पूर्ण झाली नाही. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही ४२ कोटींच्या पाणी योजनेचे टेस्टिंग करून ती वापरात आणावी म्हणून नगराध्यक्ष यांना विनंती करत आहोत. त्यामुळे पाण्याचे लॉसेस कमी होतील. परंतु, नगराध्यक्ष फक्त श्रेय घेऊन स्वतःची निष्क्रियता आमच्या माथी मारायचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली. उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांच्यासह कैलास जाधव, योगेश बागुल, जितेंद्र रणशूर, ऐश्वर्या सातभाई, विजय आढाव, शिल्पा रोहमारे यांनी आपली भूमिका मांडली.