लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर (जि. अहिल्यानगर) : भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापण्याचे साहित्य, फाटलेल्या बनावट नोटा जप्त करत ३१ वर्षीय युवकाला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गुरुवारी (दि.२०) संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुंजाळवाडी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संगमनेरात पोलिसांचे सहकार्य घेत ही कारवाई करण्यात आली.
रजनीकांत राजेंद्र रहाणे (वय ३१, रा. रहाणे मळा, गुंजाळवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध पुणे येथील डीआरआय पथकाचे ५४ वर्षीय अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रजनीकांत रहाणे हा गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचा कर्मचारी आहे. त्याने एका संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने विशिष्ट पेपर मागवला होता. त्याला तो पेपर ऑक्टोबर २०२४मध्ये कुरिअरद्वारे प्राप्त झाला.
डीआरआय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली. त्याचा शोध घेत गुरुवारी डीआरआयचे तीन अधिकारी संगमनेरात आले, यात एका महिला अधिकारी देखील होत्या. याबाबत त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना माहिती दिली. हे सर्वजण तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलिस नाईक राहुल डोके, पोलिस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे आदी पोलिस अधिकारी, कर्मचारी रजनीकांत रहाणे हा राहत असलेल्या घरी पोहोचले.
परदेशातून मागवला पेपर
गुन्हा दाखल झालेल्या रजनीकांत रहाणे याने ऑनलाइन संकेतस्थळावरून परदेशातून कुरिअरद्वारे विशिष्ट प्रकारचा पेपर मागवला होता. कारवाईदरम्यान रहाणे याच्या घरी त्या पेपरचा वापर करून भारतीय चलनाच्या बनावट फाटलेल्या १०० आणि ५०० रुपयांचा नोटा, नोटा छापण्यात वापरण्यात येत असलेला प्रिंटर जप्त करण्यात आला, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सांगितले. खासगी वाहनाने डीआरआयडीचे अधिकारी संगमनेरात आले होते. भारतीय न्याय संहितेचे (बीएनएस) कलम १७८, १८१ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विश्वास भान्सी अधिक तपास करीत आहेत.
तस्करी विरोधी गुप्तचर संस्था
महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) ही भारत सरकारची तस्करी विरोधी गुप्तचर संस्था आहे. ही संस्था, अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) अंतर्गत येते.
भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापण्याच्या संदर्भाने कारवाई करण्यात आली. यात अजूनही कुणाचा समावेश आहे का? तसेच गुन्हा दाखल झालेल्या रजनीकांत राजेंद्र रहाणे याने बनावट नोटा छापून त्या चलनात आणल्या आहेत का? याचाही अधिक तपास सुरू आहे.-रवींद्र देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक