संगमनेर : एका महिलेवर सहा नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना तालुक्यात घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सहा जणांविरूध्द सोमवारी रात्री शहर पोलिसात अत्याचार व 'अँट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान फरार झालेल्या पाच आरोपींना मंगळवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. अण्णा पावसे (वय २५), संदीप नालकर(वय २३), अरूण लामखडे(वय ३२), रा. देवगाव, असलम अहमद शेख (वय २३), रा. मदीनानगर व जावेदखान शेख (वय ३0), रा. जम-जम कॉलनी, संगमनेर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांची माहिती अशी, बाहेरील जिल्ह्यातून एक मजूर कुटुंब मोलमजुरीसाठी तालुक्यात आले होते. शनिवारी या महिलेचा पती कामानिमित्त बाहेर गेल्याने घरात ती एकटीच होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास कुणी नसल्याचे पाहून अण्णासाहेब गोविंद पावसे, देविदास भारत कदम, गणेश विठ्ठल नालकर, अरूण रामभाऊ लामखडे व इतर दोघे अशा एकूण सहा नराधमांनी घरात प्रवेश केला.
महिलेस धमकावून या नराधमांनी शाळेच्या जुन्या खोलीत नेऊन आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केले. पती घरी परतल्यावर महिलेने घडलेला प्रकार सांगितला. घटनेची खबर शहर पोलिसात देण्यात आली. माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी घटनास्थळी भेट दिली.
शहर पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी पंचनामा करून महिलेचा जबाब नोंदविला. या प्रकरणी महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील चौघांसह दोन अज्ञात आरोपींविरूध्द सोमवारी अत्याचार व 'अँट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने मंगळवारी दुपारी देवगाव व संगमनेर शहरातून अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)