केडगाव : शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहाजीराजांच्या लढाईची पार्श्वभूमी असणारे पारगाव भातोडी (ता. पारनेर) या गावच्या सरपंच मीनाक्षी शिंदे यांनी पर्यटनमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन पारगाव येथे छत्रपती शहाजीराजे भोसले यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी केली.
यावेळी व्याख्याते गणेश शिंदे यांनी स्मारकाची संकल्पना मंत्री तटकरे व पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली.
माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम आण्णा शेलार यांनी या कामी विशेष सहकार्य केले. यावेळी तटकरे यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देऊन यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना मांडली.
भातोडी पारगाव परिसरात ऐतिहासिक लढाई झाली. यात शहाजीराजांचे शौर्य दिसून आले. यात त्यांचे बंधू शरीफजीराजे यांना वीरमरण आले. या ऐतिहासिक परिसरात शहाजीराजांचे शौर्य सतत स्मरणात राहावे यासाठी त्यांचे स्मारक उभारण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. पर्यटनमंत्री तटकरे यांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे शिंदे यांनी सांगितले.