लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणाचा मुद्दा भारतीय जनता पक्ष व विश्व हिंदू परिषदेचा असला तरी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी राममंदिरासाठी मोठा निधी समर्पित केला आहे.
श्रीराम मंदिर उभारणीसाठी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी ५ लाख, नीलेश लंके यांनी १ लाख, किरण लहामटे यांनी ५० हजार, लहू कानडे यांनी ५१ हजारांची आर्थिक मदत दिली आहे. सर्वाधिक निधी आ. संग्राम जगताप यांनी दिला. श्रीराम मंदिरासाठी आर्थिक मदत करण्यात महाविकास आघाडीचे आमदारही आघाडीवर आहेत. स्थानिक पातळीवर भाजप नेत्यांशी मतभेद असले तरी राममंदिर सर्वांचे आहे, अशी भूमिका घेत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सढळ हाताने मदत केली. काहींनी मात्र मदत न करता हात आखडता घेतला. राममंदिर उभारणीच्या नावाखाली खंडणी वसूल केली जाते, अशी टीका केली गेली. त्याला भाजपकडून उत्तरही दिले गेले. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या; पण काहींनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून राममंदिरासाठी मदत केली. मंदिरासाठी आर्थिक मदत करणाऱ्यांमध्ये केवळ भाजपच्याच आजी-माजी आमदारांचा समावेश आहे, असे नाही. महाविकास आघाडीच्या आमदारांनी निधीसाठी पुढाकार घेतला.
श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी समर्पण अभियान जिल्ह्यात राबविण्यात आले. त्यासाठी उत्तर व दक्षिण, असे जिल्ह्याचे दोन विभाग करण्यात आले. निधी समर्पण अभियानात विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. सोबतीला भाजपचे पदाधिकारी, आजी- माजी आमदार, कार्यकर्तेही होते. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात निधी संकलित झाला. निधी संकलानाचे काम सध्या थांबविण्यात आले आहे. जिल्ह्यातील संकलित झालेल्या निधीची माहिती स्वयंसेवकांकडून दिली जाईल, असे सांगण्यात आले.
....
राजकीय भूमिका बाजूला ठेवून मंदिरासाठी मदत
श्रीराम मंदिर उभारणे हा मुद्दा जरी भाजपचा असला तरी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या पक्षांच्या लोकप्रतिनिधींनीही आर्थिक मदत केली. राजकीय पक्षांच्या भूमिका बाजूला ठेवून मदत गेली. त्यामुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात निधी संकलित झाला आहे.